दाहोद: वळणावर ओव्हरटेक करण्याची घाई धोकादायक ठरू शकते. ओव्हरटेक करताना शेजारी अवजड वाहनं असल्यास विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा अतिघाई जीवावर बेतू शकते. गुजरातच्या दाहोदमध्ये ओव्हरटेक करणारा एक दुचाकीस्वार थोडक्यात वाचला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून तरुण अपघातातून बचावला.
भरधाव वेगानं चाललेल्या बसला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराचा अंदाज चुकला. बस वळण घेत असल्याचं बहुधा त्याच्या लक्षात आलं नाही. वेगात असलेल्या दुचाकीला बसची धडक बसली आणि दुचाकीस्वार बसच्या खाली आला. बसच्या धडकेनं दुचाकी काही अंतरावर जाऊन पडली आणि दुचाकीस्वार बसखाली आली. त्यामुळे बस चालकानं बस थांबवली.
दैव बलवत्तर असल्यानं दुचाकीस्वार अपघातातून बचावला. बसच्या खाली जात असताना तो सुदैवानं चाकांच्या खाली आला नाही. बस चालकानं तातडीनं ब्रेक दाबल्यानं अनर्थ टळला. दोन चाकांच्या मध्ये पडलेला दुचाकीस्वार पुढील काही सेकंदांमध्ये स्वत:हून बाहेर आला. स्वत:ला सावरत तो उभा राहिला.
अपघातातून सावरत असलेला दुचाकीस्वार आधी रस्त्याच्या कडेला गेला. त्यानंतर त्यानं रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुचाकीला पाहिलं आणि बस चालकाकडे पाहून काहीतरी बोलू लागला. बस चालकानं वेळीच ब्रेक दाबल्यानं तरुणाचे प्राण वाचले. अपघात पाहून रस्त्यावरून जाणारी वाहनं थांबली. काही जणांनी तरुणाची अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या कडेला आणली. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.