अहमदाबाद:गुजरातमध्ये एका केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचमहाल जिल्ह्यातील फ्लोरा केमिकल फॅक्टरीत हा भीषण स्फोट झाला, यात दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला, तर 12हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास रणजीतनगर येथील गुजरात फ्लोरो केमिकल कंपनीच्या एमपीआय-1 प्लांटमध्ये स्फोट झाला. यानंतर प्लांटमध्ये आग वेगाने पसरली. मात्र, यावेळी प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात इतर कंपन्यांचे प्लांटही आहेत. मात्र, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग पसरण्यापासून रोखली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या आगीत कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंचमहालच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, घोघंबा तालुक्यातील रणजीतनगर गावाजवळ गुजरात फ्लोरो केमिकल्स लिमिटेडचा रासायनिक उत्पादनाचा कारखाना आहे. ज्यामध्ये सकाळी 10 च्या सुमारास मोठा स्फोट झाला. फॅक्टरीत स्फोट कसा झाला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.