गुजरात: वलसाडच्या कुसूम विद्यालयात गेल्या सोमवारी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. माझा आदर्श नथुराम गोडसे असा वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे. महात्मा गांधींवर टीका करणाऱ्या आणि गोडसेला आदर्श म्हणवणाऱ्या मुलाला पहिलं बक्षीस देण्यात आलं. त्यानंतर यावरून एकच वाद सुरू झाला.
शाळेतील इयत्ता ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय ११ ते १३ वर्षांच्या दरम्यान असतं. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय स्थानिक सरकारी कार्यालयाकडून देण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांवरूनच या स्पर्धेचं आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापिका अर्चना देसाई यांनी दिली.
नथुराम गोडसेला आदर्श म्हणवणाऱ्या स्पर्धेची माहिती पालकांपर्यंत पोहोचताच वाद सुरू झाला. पालकांनी शाळेला धारेवर धरलं असताना राजकीय पक्षांनी वादात उडी घेतली. इतिहास बदलण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट कारस्थान रचत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. गांधींना मानता की गोडसेंची पूजा करता, असा सवाल काँग्रेसकडून भाजपला विचारण्यात आला.
या प्रकरणी गृहमंत्री हर्ष संघवी यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी असा विषय देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. हे प्रकरण चर्चेत येताच भूपेंद्र पटेल सरकारनं विषय निवडणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं.