लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली / अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने १५६ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळविला. या यशामागे सरकारचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणाऱ्या धाडसी फॉर्म्युल्याचा हात असल्याचे मानले जात असून इतर राज्यांतही भाजप हा फॉर्म्युला वारण्याची शक्यता आहे.
गुजरात निवडणुकीच्या १४ महिने आधी भाजपने राज्यात मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व २२ मंत्र्यांनाही हटविले होते. नंतर भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यात एकही वादग्रस्त, अथवा वाईट भूतकाळ असलेला नव्हता. उमेदवारी देतानाही असेच धाडस भाजपने दाखवले. गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, गुजरातमधील हा फॉर्म्युला इतर राज्यांत वापरला जाऊ शकतो.
ही चाल ठरली गेमचेंजर१८२ पैकी १०३ मतदारसंघांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. ५ मंत्र्यांसह ३८ आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली. या साहसी प्रयोगामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी धारणा (अँटी इनकम्बन्सी) तोडून ऐतिहासिक विजय मिळविणे शक्य झाले, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाउ शकते.
गुजरात विधानसभेत एकच मुस्लिम आमदार१८२ सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे इम्रान खेडावाला हे एकमेव मुस्लिम आमदार ठरले आहेत. मावळत्या विधानसभेत ३ मुस्लिम आमदार होते. तिघेही काँग्रेसचेच होते. खेडावाला हे जमालपूर-खडिया मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. काँग्रेसने ६ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. इतर ५ जण पराभूत झाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळाnपुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि कर्नाटक या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांत ऐतिहासिक बदलांचा फॉर्म्युला कसा वापरता येईल, यावर भाजप नेतृत्व विचार करीत आहे. nमध्य प्रदेशात मजबूत प्रस्थापितविरोध आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला १०९ तर काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. नंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसह बंड केल्यामुळे भाजप पुन्हा सत्तेत आली. nतेथे हा फॉर्म्युला वापरता येऊ शकतो. तसेच राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.