ऑनलाइन लोकमत -
अहमदाबाद, दि.१७ - गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी तसंच गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी समजून घेण्यासाठी पोलिसांत नव्याने भर्ती होणा-यांसाठी प्रशिक्षण दिलं जात. मात्र गुजरातमध्ये हे प्रशिक्षण देण्यासाठी चक्क गुन्हेगारांचीच मदत घेतली जात आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेच्या 'गुन्हेगारांकडून शिका' अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण दिलं जात आहे. कायदा - सुव्यवस्था सुधारावी यासाठी पोलीस हा प्रयत्न करत आहेत.
खुनाचे आणि खंडणीचे गुन्हे दाखल असणा-या गँगस्टर विशाल गोस्वामीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जबाबाची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे. यामध्ये विशाल गोस्वामीने गाडीमध्ये हत्यारे कशी आणि कुठे लपवली जातात याची माहिती दिली आहे. आणि मुख्य म्हणजे इतकी हत्यारे गाडीत लपवली असतानादेखील पोलीस नाकाबंदीतून त्यांची सुटका होते. विशाल गोस्वामीने हत्यारे कुठे लपवतात याचं प्रात्यक्षिक दाखवल्यावर पोलीसदेखील आश्चर्यचकित झाले. कारण एका गाडीत 6 हत्यारे लपवली असताना पोलिसांना मात्र त्याचा काहीच सुगावा लागत नाही.
याचप्रमाणे पोलिसांनी इतर गुन्हेगारांच्या जबाबाचीदेखील रेकॉर्डींग केली आहे. गोवा रबारी हा आरोपी वडोदरा कारागृहात आहे. कडक सुरक्षाव्यवस्था असतानादेखील कारागृहात मोबाईल कसे आणले जातात याची माहिती पोलीस त्याच्याकडून घेणार आहेत. पोलीस चोरांचे आणि दरोडेखोरांची जबाबदेखील घेत आहेत. तसंच रितेश या आरोपीकडून लॉक केलेल्या गाड्यांमधून चोरी कशी केली जाते याची माहिती घेणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.
गुन्ह्याची उकल झाल्यानंतर तो नेमका घडला कसा याची माहिती पोलिसांना मिळते मात्र असे अनेक गुन्हे असतात ज्यांची उकल झालेलीच नसते किंवा ते नेमके घडले कसे ? याची माहिती पोलिसांना मिळतच नाही. अशावेळी पोलिसांची होणार दमछाक थांबण्यासाठी पोलिसांनी हा पर्याय निवडला आहे.