गुजरातमध्ये अचानक मुख्यमंत्री बदलल्याने भाजपामध्ये आधीच खळबळ उडालेली असताना आजचा नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Gujarat CM Bhupendra Patel) यांच्या मंत्रिमडळाचा शपथविधी सोहळा काही तासांसाठी पुढे ढकलावा लागला आहे. यामुळे गुजरातभाजपात सारेकाही आलबेन नसल्याचे दिसत आहे. मंत्रिमंडळ निवडीवरून मोठा वाद सुरु झाला आहे. (first reshuffle of Gujarat Cabinet under Bhupendra Patel, Clashes in BJP Over Full changing ministers.)
गुजरातमध्ये अचानक विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. यामध्ये भाजपाने भल्या भल्यांचे पत्ते कापत भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले होते. त्यांचा शपथविधीही पार पडला. मात्र, कॅबिनेटचा (Gujarat new cabinet)पहिल्या टप्प्यातील थपथविधी आज दुपारी होणार होता. परंतू मंत्री पदांवरून भाजपात नाराजांनी विरोध केल्याने हा शपथविधी सायंकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
भूपेंद्र पटेलांना जुने मंत्रिमंडळच बदलायचे आहे. नव्या नेत्यांना, त्यांच्या मर्जीतील आमदारांना संधी द्यायची आहे. यामुळे भाजपात अंतर्गत कलह वाढल्याचे समजते. रुपाणी यांच्या काळातील मंत्र्यांची पदे जाणार आहेत. सुत्रांनी आजतकला दिलेल्या माहितीनुसार भाजपाचे 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामे केले जाणार आहे. केवळ एक किंवा दोनच मंत्री असे असतील जे पुन्हा मंत्री होतील. यावरून भाजपामध्ये वाद विकोपाला गेला आहे.
भूपेंद्र पटेल सरकारच्या 21 ते 22 मंत्र्यांना आज शपथ दिली जाऊ शकते. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार आहे. यामुळे पक्षाचे जुने वरिष्ठ मंत्री नाराज झाले आहेत. जातीय समीकरण आणि स्वच्छ चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपाने रणनिती आखली होती. परंतू हा खेळ उलटा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.