गुजरात प्रदेश काँग्रेस अखंड राहणार? माजी खासदार सागर रायकांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 07:33 AM2021-12-07T07:33:51+5:302021-12-07T07:34:39+5:30
पक्षाचे नेते राहुल गांधी हे सत्ताधारी भाजपला जोरदार लढत देण्यासाठी काम करीत आहेत.
व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गुजरात प्रदेश काँग्रेस अखंड राहील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील नेते आणि माजी खासदार सागर रायका हे पक्षात वेगळे पडल्यापासून कोणत्याही दिवशी पक्ष सोडण्याचे संकेत त्यांनी दिले असून इतर नेते याच कामासाठी योग्य वेळेची वाट बघत आहेत.
पक्षाचे नेते राहुल गांधी हे सत्ताधारी भाजपला जोरदार लढत देण्यासाठी काम करीत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा प्रवेश राज्यात झाल्यास लढत तिरंगी होईल व काँग्रेसमधील नेत्यांना यामुळे भाजपची शहर भागातील मते मिळतील अशी आशा आहे तर भाजपला ‘ आप ’ मुळे विरोधकांची मते विभागले जातील, असे वाटते. रायका म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून भाजपमध्ये जाऊ शकतो’.
सोनिया गांधींना भेटले
सागर रायका यांनी गेल्या ४ दशकांत संघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिवही होते. परंतु, त्यांना डावलले जात असल्यामुळे ते नाराज आहेत. रायका यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील वस्तुस्थिती त्यांना सांगितली.