राजकोट - गुजरातच्या राजकोट इथं टीआरपी शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या गेमिंग झोन भागात आग लागल्यानं ३५ जणांचा जीव गेला आहे. या मृतांमध्ये १० लहान मुलांचाही समावेश आहे. या भयंकर दुर्घटनेनंतर गुजरात हायकोर्टाने स्वत: दखल घेतली आहे. उन्हाळी सुट्टी असतानाही सोमवारी विशेष न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणी सुनावणी करेल आणि दोषींबाबत योग्य ती कारवाई घेईल.
या दुर्घटनेत इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या मृत्यूमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. दिवसा लागलेल्या आगीत इतके लोक अडकले कसे आणि त्याचे जीव गेले हा प्रश्न आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गेमिंग झोनमध्ये शनिवारी ९९ रुपये विकेंड स्कीम सुरु केली होती. या स्कीममुळे मोठ्या प्रमाणात लहान मुलांसह लोकांची गर्दी झाली होती. परंतु त्याठिकाणी ५ ते ६ फुटाचा केवळ एकच एन्ट्री गेट होता. आग लागल्यानंतर अनेकांना बाहेर पडता आलं नाही त्यामुळे गुदमरून अनेकांचा मृत्यू झाला.
या अग्निकांडानंतर सोशल मीडियावर एक फॉर्म व्हायरल होत आहे. त्यात टीआरपी गेमिंग झोनकडून येणाऱ्या प्रत्येकाचे फॉर्म भरून घेतले होते. त्यात लिहिलं होतं की, जर याठिकाणी काही हानी झाल्यास त्यासाठी गेमिंग झोन जबाबदार राहणार नाही. Game Zone मध्ये कुठलीही दुर्घटना घडली त्यात कुणालाही दुखापत झाली तर त्यासाठी स्वत: संबंधित व्यक्तीच जबाबदार धरली जाईल. गेमिंग झोन प्रशासन कुठल्याही नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही. या फॉर्मवर सही केल्यानंतरच लोकांना आत सोडलं जात होते.
पोलिसांनी या प्रकरणात गेमिंग झोनचे मालक आणि मॅनेजर यांना अटक केली आहे. या अग्निकांडात लोकं अक्षरश: पूर्ण जळालेत. त्यामुळे अनेकांची ओळख पटवणं हे पोलिसांसमोरील मोठं आव्हान आहे. या घटनेत मृत पावलेल्या मृतदेहांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे डीएनए नमुने गोळा करण्याचं काम केले जात आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही घटनास्थळी पाहणी केली. हॉस्पिटलला जात जखमींची विचारपूस केली. या घटनेची चौकशी करण्यासाठी ५ सदस्यीय एसआयटी गठीत करण्यात आली आहे.
आग कशी लागली?
राजकोटच्या २ एकर जमिनीवर ३ मजली गेमिंग झोन २०२० मध्ये बनवलं होतं. त्याचे स्ट्रक्चर लाकूड आणि टीन शेडवर होतं. अनेक ठिकाणी रिपेरिंग आणि रिनोवेशन काम सुरू होते. एका जागेवर वेल्डिंगचं काम सुरू असताना त्यातून ठिणगी पडली आणि आसपासला आग लागली. गेमिंग झोनमध्ये डोम कपडे आणि फायबर होतं. जमिनीवर रबड, रेग्झिन आणि थर्मोकोल होतं. त्याशिवाय इथं २ हजार लीटर डिझेल आणि १५०० लीटर पेट्रोलही स्टोअर करून ठेवलं होतं. त्यामुळे ही आग काही मिनिटांतच सगळीकडे भडकली असं बोललं जात आहे.