नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील गुजरातकाँग्रेसची याचिका फेटाळली. या संदर्भातील याचिका निवडणूक आयोगासमोर सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्ते गुजरात प्रदेश काँग्रेसचे वकील विवेक तंखा यांना केल्या. तसेच निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतरच आम्ही निवडणूक याचिकेप्रमाणे सुनावाई करू, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, रेग्युलर रिक्त जागा भरण्यासाठी सोबत निवडणूक होते. परंतु, अकस्मिक रिक्त झालेल्या जागांवर सोबत निवडणूक घ्यावी, अशी काही प्रतिबद्धता नाही. विविध विषयांवर न्यायालयाच्या आदेशांमुळे आता तिसरी स्टेट्युटरी श्रेणी समोर आली आहे. त्यामुळे ही याचिका तुम्ही निवडणूक आयोगात दाखल करा, असंही न्यायालयाने म्हटले आहे.
भाजपच्या विजयाची शक्यता वाढली
न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप राज्यसभेच्या दोन्ही जागांवर विजय मिळवणार अशी स्थिती आहे. संख्याबळानुसार गुजरातेत राज्यसभेवर जाण्यासाठी उमेदवाराला ६१ मतांची गरज आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशननुसार आमदार दोन वेळा मतदान करणार आहे. भाजपकडे गुजरातेत १०० हून अधिक आमदार असून या आमदारांनी दोनवेळा मतदान केल्यास भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतात.
केंद्रीय मंत्री अमित शाह गांधीनगर मतदार संघातून आणि स्मृती इराणी अमेठी लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर एकत्र निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते परेशभाई धनानी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली.
...तर काँग्रेसला एक जागा मिळाली असती
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०० आमदार असून काँग्रेसचे ७१ आमदार आहेत. तर सात जागा रिक्त आहेत. अशात रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर एकत्र मतदार झाल्यास, आमदारांना केवळ एकदाच मतदान करता येणार आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा जिंकू शकते. म्हणून काँग्रेसला दोन्ही जागांसाठी एकत्र निवडणूक हवी आहे.