गोध्रा: गुजरातमधील एका न्यायालयाने २००२ मधील जातीय दंगलींदरम्यान कलोलमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या डझनभराहून अधिक सदस्यांची हत्या आणि सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी असलेल्या सर्व २६ जणांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
एकूण ३९ आरोपींपैकी १३ आरोपींचा खटला प्रलंबित असताना मृत्यू झाल्याने त्यांच्यावरील खटला थांबवला. पंचमहाल जिल्ह्यातील हलोल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश लीलाभाई चुडासामा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी पुराव्याअभावी खून, सामूहिक बलात्कार आणि दंगलीच्या गुन्ह्यातून २६ जणांची निर्दोष मुक्तता केली. गोध्रा येथे २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या साबरमती रेल्वे जाळण्याच्या घटनेनंतर १ मार्च २००२ रोजी उसळलेल्या जातीय दंगलीत हे आरोपी जमावाचे भाग होते. आरोपींविरुद्ध २ मार्च २००२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी पक्षाने आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ १९० साक्षीदार आणि ३३४ कागदोपत्री पुरावे तपासले, परंतु न्यायालयाने सांगितले की साक्षीदारांच्या जबाबात विरोधाभास आहेत आणि त्यांनी फिर्यादीच्या युक्तिवादाचे समर्थन केले नाही.
एन्काऊंटर प्रकरणात ३६ आरोपी निर्दोष
उत्तर प्रदेशातील भदोही जिल्हा न्यायालयाने चार जणांच्या एन्काऊंटरशी संबंधित २५ वर्षे जुन्या प्रकरणात ३४ पोलिस कर्मचाऱ्यांसह ३६ जणांची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली. ऑक्टोबर १९९८ मध्ये पोलिसांनी दावा केला होता की, दरोड्यासाठी जाणारे धनंजय सिंग यांच्यासह चौघांना ठार मारले होते. नंतर निष्पन्न झाले की, धनंजयसारखीच एक व्यक्ती चकमकीत मारली गेली आहे.