नरोडा येथील हिंसाचारप्रकरणी माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी, जयदीप पटेल यांच्यासह सर्व 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुजरातच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी (20 एप्रिल) याप्रकरणी निकाल दिला. या हत्याकांडात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला होता.
तत्पूर्वी, 27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला पेट्रोल ओतून गुजरातमधील गोध्रा येथे अनेक कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते. यानंतर, 28 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरात बंदची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, अहमदाबाद शहरासह संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या. या दंगलींमध्ये 28 फेब्रुवारी रोजी नरोडा गावात आणि बाहेर 11 जणांना जिवंत जाळण्यात आले होते.18 आरोपींचा झालाय मृत्यू - या खटल्यात भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह एकूण 86 जण आरोपी होते. यांपैकी 18 जणांचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. गोध्रा येथे जाळण्यात आलेल्या रेल्वेच्या बोगीत अयोध्येहून परतणाऱ्या एकूण 58 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. यानंतर 28 फेब्रुवारी 2002 रोजी अहमदाबाद शहरातील नरोडा गाव आणि परिसरात दंगल उसळली होती.या प्रकरणात, गृहमंत्री अमित शाह हे 2017 मध्ये कोडनानी यांच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर झाले होते. कोडनानी या 2002 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये मंत्री पदावर कार्यरत होत्या. याशिवाय, कोडनानी यांना नरोडा पाटिया दंगल प्रकरणातही दोषी ठरविण्यात आले होते. या दंगलीत एकूण 97 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यांना 28 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता.लावण्यात आली होती ही कलमे -नरोदा ग्राम प्रकरणात आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 143 (बेकायदेशीर लोक जमवणे), 147 (दंगल), 148 (घातक शस्त्रांसह दंगल करणे), 120बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत खटला सुरू होता.