ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि एस. गुरूमूर्ती यांना प्रतीवादी बनवण्यासंदर्भात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. शहा व गुरूमूर्ती यांचा न्यायाप्रक्रियेत अडथळा आणण्यात सहभाग होता, असा आरोप भट यांनी केला होता.
शहा व गुरूमूर्ती यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून तपास व्हावा अशी मागणी भट यांनी केली होती, मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच गुजरातचे माजी अॅडव्होकेट जनरल तुषार मेहता यांचा ईमेल हॅक केल्याप्रकरणी भट यांच्याविरोधात कारवाई करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली.
गुजरात दंगलीदरम्यान राज्यातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका उघड करण्यापासून सरकारने रोखल्याचा आरोप करत संजीव भट यांनी सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती.