गुजरातमधील आणंदजवळ अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि लक्झरी बसमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातून राजस्थानला जाणाऱ्या बसला मागून धडक बसल्याने अपघात झाला. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांसह आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
राजस्थानला जात होती बस
लक्झरी बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना आणंद जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल केलं. तर इतर जखमींचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानला जाणाऱ्या बसचा टायर पंक्चर झाल्याने ती महामार्गाच्या बाजूला उभी होती. बस चालक, क्लीनर आणि प्रवासी बसच्या बाहेर येऊन उभे होते. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.
गुजरातच्या पाटण जिल्ह्यात गेल्या शुक्रवारी एक अपघात झाला होता. बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये बसचा चालक आणि कंडक्टरचाही समावेश आहे. ही बस आणंद येथून कच्छच्या रापर येथे जात होती.