कोर्टात आजवर असे अनेक खटले दाखल झाले की ज्यावर निकाल देताना न्यायाधीशांसाठी खूप कठीण काम होऊन बसतं. पण गुजरात हायकोर्टासमोर असाच एक गुंतागुंतीचा आणि अजब खटला आला आहे. खासगी कार्यालयामध्ये एखादं कपल किस करू शकतं की नाही? याचा निर्णय कोर्टाला द्यायचा आहे. एकाद्या खासगी कार्यालयामध्ये प्रेमी युगुलानं किस केलं तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे का? याचा निर्णय कोर्टाला घ्यायचा आहे. जर तो वैयक्तिक अधिकारात मोडत असेल मग कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवणं आणि चित्रीकरणं करणं हे वैयक्तिक अधिकाराचा भंग करणं ठरणार नाही का? त्याबाबत एखादा व्यक्ती मानहानीचा दावा करू शकणार का? याबाबतही कोर्टाला निकाल द्यावा लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?गुजरातच्या भावनगर येथील तांबोली कास्टिंग लिमिटेड कंपनीमध्ये व्हेनेझुएलाची एक इंजिनिअर काम करत होती. तिनं कंपनीचे संचालक वैभव तांबोली आणि त्यांचे वडील विपिन तांबोली यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ती आणि तिचा सहकारी कर्मचारी कार्यालयात एकमेकांना किस करत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज हे दोघं पाहत असत आणि ते फुटेज त्यांनी व्हायरल केल्याचा आरोप तक्रारदार तरुणीनं केला आहे.
संबंधित महिला कर्मचारी ज्या व्यक्तीला किस करत होती ती व्यक्ती देखील तांबोली परिवारातीलच सदस्य असून त्यांचं नाव मेहुल तांबोली असं आहे. मेहुल तांबोली यांचं त्याच्या कुटुंबियांसोबत भांडण सुरू असून कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये वैभव तांबोली यांनी मेहुल याच्यावर चाकूनं वार केल्याचाही दावा करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएलच्या तक्रारदार महिलेनं अहमदाबादच्या वरतेज पोलीस ठाण्यात वैभव आणि विपिन तांबोली यांच्याविरोधात सीसीटीव्ही फुटेज लीक करण्याची तक्रार दाखल केली आहे. या दोघांवर आयपीसी ३५४ आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
तांबोली कुटुंबियांचं म्हणणं काय?पोलीस ठाण्यात एफआयर दाखल झाल्यानंतर वैभव तांबोली आणि त्यांच्या वडिलांनी वकिलाच्या माध्यमातून संपूर्ण घटनेवर स्पष्टीकरण दिलं आहे. तर वकील महेश जेठमलानी आणि अजय चोक्सी यांनी कोर्टात कलम ३५४ अंतर्गत किस करणं याचा वैयक्तिक अधिकारात समावेश होत नसल्याचा दावा केला आहे. यासोबतच जर कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे हे माहिती असतानाही तुम्हाला कुणी पाहत नाहीय असा तुम्ही विचार करू शकत नाही, असंही तांबोली यांच्या वकिलांनी कोर्टासमोर म्हटलं आहे.