NEET UG Result 2024: ‘नीट’ परीक्षेच्या गोंधळानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुनर्परीक्षेचा शहरनिहाय निकाल शनिवारी जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर आता समुपदेशन वेळापत्रक जाहीर होऊन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मात्र या निकालातही घोळ असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या गुजरातच्या एका विद्यार्थीनीला तब्बल ७२० गुण मिळाले आहेत. या निकालाने विद्यार्थीनीचे शिक्षक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
गुजरातमधील एका विद्यार्थीनीने नीट-यूजी परीक्षेत ७२० पैकी ७०५ गुण मिळवले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ही विद्यार्थीनी बारावीत नापास झाली होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अहमदाबादमधील एका विद्यार्थीनीने हा पराक्रम केला. बारावी आणि नीट-यूजीच्या परीक्षेला बसलेल्या या विद्यार्थीनीची मार्कशीट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही मार्कशीटमधील एवढा मोठा फरक पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित व्यक्त करतोय. मात्र, ही मार्कशीट गुजरातमधील त्याच विद्यार्थीनीची आहे की नाही, याची पुष्टी झालेली नाही.
गुजरात बोर्डाच्या बारावीच्या मार्कशीटनुसार, विद्यार्थीनीला भौतिकशास्त्रात २१, रसायनशास्त्रात ३१, जीवशास्त्रात ३९ आणि इंग्रजीमध्ये ५९ गुण मिळाले. एकूण ७०० पैकी ३५२ गुण मिळाल्याने ती विद्यार्थीनी परीक्षेत नापास झाली. शाळेतल्या खराब कामगिरीबद्दल तिच्या पालकांनाही शिक्षकांनी बोलवलं होतं. तिच्या कोचिंग सेंटरने सांगितले की बारावीत असताना दोनदा मध्येच बाहेर पडली होती. विद्यार्थीनीने कोचिंग सेंटरमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी नोंदणी केली होती आणि शाळेत फक्त डमी विद्यार्थी म्हणून नोंदणी केली होती.
त्यानंतर शनिवारी नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षकांना धक्काच बसला. बारावीत नापास झालेल्या मुलीने नीट परीक्षेत ७२० पैकी ७०४ गुण मिळवून ती गुजरातमध्ये अव्वल गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत सामिल झाली. विद्यार्थीनीला नीट परीक्षेत भौतिकशास्त्रात ९९.१ टक्के गुण मिळाले आहेत. तर रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रात ९९.१ टक्के गुण मिळाले आहेत.
दुसरीकडे, राजस्थानच्या सीकर येथील प्रत्येक केंद्रातून ७५ पेक्षा जास्त नीट उमेदवारांना ६०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. दरम्यान, वैद्यकीय प्रवेश परीक्षेत असे गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.