वडोदरा - गुजरातमध्ये मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वडोदरा शहरात पूर आला आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळे लोकांना सुरक्षितस्थळी हलिवण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगाने सुरु आहे.
वडोदरा शहराला पुराच्या पाण्याने वेढल्याने शहराची परिस्थिती खराब झाली आहे. याच दरम्यान वडोदरामधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहिला तर श्री कृष्णाच्या काळातील एका घटनेची आठवण येईल. पोलीस उपनिरीक्षक जी. के चावडा यांनी भरपावसात खांद्यापर्यंत भरलेल्या पाण्यातून एक महिन्याच्या मुलीला वाचविलं आहे. डोक्यावरील टोपामध्ये मुलीला ठेऊन पाण्यातून रस्ता शोधत पुढे जाताना पाहायला मिळत आहे.
वडोदरातील विश्वामित्री रेल्वे स्टेशनजवळील देवपुरा परिसरात 70 कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले होते. यामध्ये एका कुटुंबात 1 महिन्याची मुलगीदेखील होती. रावपुरा पोलीस स्टेशनमधील कर्मचारी लोकांना वाचविण्यासाठी याठिकाणी पोहचले. तेव्हा पोलिसांच्या टीमचं नेतृत्व करणारे जी. के चावडा यांनी दोरीच्या साहय्याने लोकांना बाहेर काढण्याचं काम करत होते. त्यावेळी कुटुबातील एका महिन्याच्या मुलीला त्यांनी एका टोपाच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं.
पुराचं पाणी वाढत असल्याने मुलीला बाहेर काढताना आई-वडील घाबरलेल्या अवस्थेत होते. पाण्याचा प्रवाह वाढण्याअगोदर लोकांना सुरक्षितस्थळावर नेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. जी. के चावडा यांचा मुलीला वाचविताना फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.