सुरत-गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील शाळेत शिकणाऱ्या एका 8वीतील विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रिद्धी मेवाडा, असे विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेनंतर शाळेत शांतता पसरली आहे. आपल्या सोबत शिकणाऱ्या, रोज एकत्र खेळणाऱ्या मैत्रिणीचा अचानक मृत्यू झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या गोदादरा भागातील गीतांजली स्कूलमध्ये ही घटना घडली. साईबाबा सोसायटीत राहणारे साडीचे व्यापारी मुकेश भाई मेवाडा, यांची मुलगी रिद्धी या शाळेत शिकायची. बुधवारी शिक्षक शिकवत असताना रिद्धी अचानक बेशुद्ध पडली. यानंतर समोरच शिकवणाऱ्या शिक्षिकेने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना वर्गात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
रिद्धी उठत नसल्याचे पाहून शिक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच पालकांना मोठा धक्का बसला. पालकांनी सांगितले की, रिद्धीने कधीही छातीत दुखण्याची किंवा इतर लक्षणांची तक्रार केली नाही. इतक्या लहान वयात रिद्धीच्या अकाली निधनाने पालकांसह शिक्षकांच्या मनावरही मोठा आघात झाला आहे.
यापूर्वीही घडली घटनाया वर्षी लखनौ शहरातील माँटेसरी शाळेतील एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेतील शिक्षकांनी सांगितले होते की, वर्गात शिक्षक शिकवत होते, यावेळी विद्यार्थी अचानक बेशुध्द पडला. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.