गुजरातमध्ये 37 प्रवाशांनी भरलेली एक पर्यटक बस काल रात्री उशिरा भावनगरमधील कोलियाक गावात पुरामध्ये अडकली होती. बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यात तामिळनाडूतील 29 प्रवाशांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी आर. के. मेहता यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी सायंकाळी कोलियाक गावाजवळ एक लहान नदी ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलावर बस अडकली होती. तथापि, आठ तासांच्या प्रदीर्घ ऑपरेशननंतर सर्व यात्रेकरूंची सुखरूप सुटका करण्यात आली. कोलियाक गावाजवळील निश्कलंक महादेव मंदिरात दर्शन घेऊन सर्व भाविक भावनगरकडे निघाले होते. परिसरात मुसळधार पावसामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. असे असतानाही बस चालकाने नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला.
मेहता म्हणाले, बचाव कर्मचारी मिनी ट्रकसह घटनास्थळी पोहोचले आणि बसच्या मागील खिडकीतून सर्व 27 यात्रेकरू, चालक आणि सफाई कामगार यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, बसमधून सर्वांना बाहेर काढल्यानंतर मिनी ट्रकही रस्त्यावर अडकला. यानंतर, एक मोठा ट्रक घटनास्थळी पाठवून सर्व 29 प्रवाशांना आणण्यात आले. यातील बहुतांश यात्रेकरू ज्येष्ठ नागरिक होते. सुमारे आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर पहाटे तीनच्या सुमारास सर्व यात्रेकरूंना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. तसेच, आम्ही भावनगरमध्ये त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली अशून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.