ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain PM Boris Johnson) यांनी गुरूवारी उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची भेट घेतली. अहमदाबादमधील शांतिग्राम येथे असलेल्या अदानी ग्लोबल हेडक्वार्टरमध्ये ही भेट झाली. या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी ब्रिनटनच्या पंतप्रधानांचं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं. ब्रिटनच्या इतिहासात कोणत्याही कार्यरत असलेल्या पंतप्रधानांनी यापूर्वी गुजरातचा दौरा केला नव्हता.
अदानी समुहाच्या जागतीक मुख्यालयात बोरिस जॉन्सन आणि गौतम अदानी यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात झाली. भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणं हा यामील उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी एनर्जी ट्रांझिशन, क्लायमेट अॅक्शन, एअरोस्पेस, डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि ह्युमन कॅपिटलसारख्या क्षेत्रातील विकासासह अन्य मुद्द्यांवर चर्चा केली.
यापूर्वी गौतम अदानी आणि बोरिस जॉन्सन यांची भेट गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये झाली होती. यामध्ये दोघांनी क्लिन एनर्जी पोहोचवण्याच्या विषयावर करत असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा केली होती. अदानी समूहाचे अध्यक्ष आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांच्यातील आजच्या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संरक्षण क्षेत्रातील सहभाग हा होता. भारताने २०३० पर्यंत सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी ३०० बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे आणि OEM क्षमता अधिक बळकट करून संरक्षण क्षेत्रातील निर्यात केंद्र म्हणून भारताची स्थापना करण्याचे अदानींचे उद्दिष्ट आहे.