गुजरातमधील वडोदरा येथील हरनी तलावात गुरुवारी एक बोट उलटल्याने 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह 16 जणांचा मृत्यू झाला. 27 विद्यार्थ्यांचा ग्रुप त्यांच्या शिक्षकांसह सहलीला गेला असताना ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेच्या एका दिवसानंतर सोशल मीडियावर या दुर्घटनेच्या आधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये न्यू सनराईज स्कूलचे विद्यार्थी बोट राईडसाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, विद्यार्थी एका रांगेत उभं राहून बोटवर जाण्याची वाट पाहत होते. रिपोर्टनुसार, विद्यार्थी आणि शिक्षक दुपारी 4.30 च्या सुमारास पिकनिकसाठी तलावावर पोहोचले आणि एका बोटीवर गेले, जी ओव्हरलोडमुळे उलटली. हरनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, या दुर्घटनेत 14 मुलं आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. वाचवण्यात आलेल्या एका विद्यार्थ्यावर एसएसजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली. पीएम मोदींनी ट्विट करून म्हटलं आहे की, वडोदराच्या हरनी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझी संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहे. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शोक व्यक्त केला आणि म्हणाल्या, गुजरातमधील वडोदरा येथे बोट दुर्घटनेत मुलं आणि शिक्षकांच्या मृत्यूची बातमी अतिशय दुःखद आहे. मी शोकाकुल कुटुंबातील सदस्यांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि बचाव कार्य यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करते. याच दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली आहे. जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.