अहमदाबाद - गुजरात निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल सातत्याने भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करत आहे. मिडीया रिपोर्ट्सनुसार, येथील विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली आहेत. निवडणूक आयोगाने ती यंत्रे नाकारली आहेत. या मुद्यावरून हार्दिक पटेलने भाजपा सरकारवर टीका केली आहे.
शुक्रवारी ट्विटरद्वारे हार्दिक पटेलने टीका केली. गेल्या 22 वर्षांमध्ये झालेल्या कोणत्याही आंदोलनाच्या मागण्या भाजपा सरकारने कधीच मान्य केल्या नाहीत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पहिल्या चाचणीत 3500 VVPAT मशीन फेल झाल्या. आता भाजपा निवडणुकांमध्ये गोलमाल करूनच लढेल असा माझा दावा आहे असं ट्विट त्याने केलं.
दरम्यान, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेससोबत जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गुजरातमध्ये दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने भाजपाला हरवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळेच सध्या गुजरातमधील भाजपा आणि मोदींच्या विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे हार्दिक पटेलनी काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा म्हणजे आजपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेससोबत जाणार की नाही याबाबत लवकरच त्यांच्याकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मागण्या मान्य न केल्यास काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल, असं त्यांनी सांगितलं होतं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सुरतमधील रॅलीत प्रचंड गोंधळ होता आणि लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली होती.