सुरेंद्रनगर - गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या हव्यासापोटी एका महिलेने आपल्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेला मुलगा हवा होता मात्र मुलगी झाली त्यामुळे महिलेने अवघ्या दोन तासाआधी जन्मलेल्या चिमुकलीला मातीत पुरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचदरम्यान कोणीतरी येत असल्याची चाहूल लागल्याने महिलेने चिमुकलीला थंडीत एक सोडून पळ काढला. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांग्रधरा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. काही स्थानिक लोकांना मुलीच्या रडण्याचा आवाज आला. स्थानिकांनी पाहिलं असता त्यांना एका खड्ड्यात लहान मुलगी दिसली. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाचा अधिक तपास केला असता लीला नावाच्या एका महिलेने मुलीला जन्म दिला असून तिची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी याप्रकरणी लीलाकडे अधिक चौकशी केली असता सुरुवातीला तिने असे काही नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र कसून चौकशी केली असता तिनेच मुलीला पुरण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. मुलगा हवा होता मात्र तिसरीही मुलगी झाली त्यामुळेच तिला जिवंत पुरण्याचा निर्णय घेतला. पण हे करत असताना आपण पकडले जाऊ याची शंका येताच तेथून पळ काढल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली.