नुकत्याच पार पडलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले होते. गेल्या २५ वर्षांपासून सत्ता असली तरी एवढ्या जागा जिंकता आल्या नव्हत्या. त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटलांना दिले होते. गुजरातमधील मोठ्या विजयानंतर पाटलांच्या प्रमोशनवर पक्ष श्रेष्ठी विचार करत आहेत.
पाटील यांना कोणती जबाबदारी द्यावी यावरून चर्चा सुरु आहे. पाटील हे नवसारीमधून तीनवेळा खासदार आहेत. यामुळे पाटलांना केंद्रात मंत्रीपद देऊन राजकीय दृष्ट्या महत्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्याची चर्चा देखील होत आहे. तसेच भाजपाच्या केंद्रीय टीममध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत त्यांना काम देऊन नड्डांचा उत्तराधीकारी बनविण्याची देखील चर्चा होत आहे.
पाटील यांनी २०२३ मध्ये काय भूमिका राहिल याचे चित्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होणार आहे. जेपी नड्डा २०२४ पर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष राहतील अशी चर्चा आहे. यासाठी त्यांना मकर संक्रांतीच्या आसपास एका वर्षाची मुदतवाढ दिली जाईल. नड्डांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. नड्डा हे सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. पाटीलांनाही सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
पाटलांमधील क्षमतांचा वापर कसा करून घ्यावा याची सध्या भाजपात चर्चा सुरु आहे. अर्थातच मोदींचा आशिर्वाद असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत. पाटलांशिवाय महामंत्री रत्नाकर यांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. रत्नाकर हे युपीचे असून गुजरातची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी बिहारमध्ये काम करत होते. भाजपचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाला आहे. याशिवाय लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जनककृष्णमूर्ती, वेकेन्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा आणि जेपी नड्डा हे आतापर्यंत अध्यक्ष झाले आहेत.