बंगळुरू/ अहमदाबाद, दि. 7 - फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमध्ये पाठवण्यात आलेले गुजरात काँग्रेसमधील 44 आमदारांची सोमवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये वापसी झाली आहे. गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविले होते. गेल्या 10 दिवसांपासून काँग्रेसचे हे 44 आमदार बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये राहत होते.
सोमवारी पहाटे जवळपास 4.45 वाजण्याच्या सरदार वल्लभभाई एअरपोर्टवर पोहोचलेल्या सर्व आमदारांना अहमदाबादपासून जवळपास 77 किलोमीटर अंतरावर असलेल्या निजानंद रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. या आमदारांना निवडणुकीपर्यंत येथेच ठेवण्यात येणार आहे.
आमदारांच्या सुरक्षेसाठी एअरपोर्टबाहेर रविवारीच सकाळी 8 वाजल्यापासून पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसचे आमदार बंगळुरूमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते ते कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांचे होते. बुधवारी ( 2 ऑगस्ट )सकाळी आयकर विभागाने डी.के. शिवकुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. तसंच काँग्रेस आमदारांना ज्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते त्यावरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. भाजपाने सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.
44 आमदार होते बंगळुरूमध्ये
गुजरातमध्ये 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलवले होते. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले होते की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलवण्यात आले. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला.