अहमदाबाद - नवरात्री हा गुजरातमधला मोठा उत्सव असून, देशातील अन्य भागांच्या तुलनेत गुजरातमध्ये दांडियारास-गरब्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. संपूर्ण गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. तरुण-तरुणीही मोठया संख्येने रात्री उशिरापर्यंत चालणा-या दांडिया-गरब्यामध्ये सहभागी होत असतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसात गुजरातमध्ये कंडोम, गर्भनिरोधक औषधांची विक्रीही मोठया प्रमाणावर वाढत असते.
नवरात्रीच्या काळात कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांची विक्री वाढते असे गुजरात स्टेट फेडरेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनने सांगितले. यावर्षी सुद्धा विक्री 35 टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्री सुरु होण्याआधीच कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांची चांगली विक्री झाली असे जीएसएफसीडीएचे अध्यक्ष जसवंत पटेल यांनी सांगितले.
गुजरातमध्ये या दिवसात रात्रीच्यावेळी अनेक पानवाल्यांची दुकान सुरु असतात. त्यांनी सुद्धा कंडोमचा स्टॉक जमवून ठेवला आहे. गुजरातमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक औषधांची महिन्याची उलाढाल 2 कोटींची आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये हा व्यवसाय 30 ते 35 टक्क्यांनी वाढतो. त्याचा कंडोम उत्पादकांना थेट फायदा होतो. मागणी वाढल्याने अनेकजण ब्रँडींगचीही संधी साधून घेतात.
गुजरात नॅशनल मेडीको ऑर्गनायझेशन या डॉक्टरांच्या संघटनेने ज्या औषधाबद्दल तुम्हाला संशय आहे ते लिहून देऊ नका असे डॉक्टरांना सांगितले आहे. 7 हजार डॉक्टर्स या संघटनेचे सदस्य आहेत. गुजरातमध्ये सध्या सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहीरातीवर वाद निर्माण झाला आहे. गुजरातच्या सूरत शहरात अभिनेत्री सनी लिओनीच्या एका जाहीरातीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कंडोमच्या जाहीरातीचा फलक लावण्यात आला असून, त्यावर सनी लिओनीचा फोटो आहे. त्यावर नवरात्रीचा संदेश असल्याने वाद निर्माण झाला आहे.
या जाहीरात फलकाविरोधात शहरातील एका गटाने निषेध आंदोलन आयोजित केले असून, हा फलक काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. कंडोमच्या जाहीरातीचा भलामोठा फलक पाहून सूरत शहरातील नागरीकांना धक्का बसला. मोबाईलमुळे ही जाहीरात व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. सोशल मीडियावर लगेच या जाहीरातीचे पडसाद उमटले.