गुजरात विकासाचे मॉडेल अपयशी, विधानसभेत काँग्रेसचा विजय निश्चित :राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:11 AM2017-09-05T01:11:38+5:302017-09-05T01:11:54+5:30
गाजावाजा केलेले विकासाचे मॉडेल गुजरातेत अपयशी ठरले असून, तेथील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरून गेले आहेत
अहमदाबाद : गाजावाजा केलेले विकासाचे मॉडेल गुजरातेत अपयशी ठरले असून, तेथील आगामी विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरून गेले आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते सोमवारी येथे पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.
काँग्रेस पक्ष येत्या निवडणुकीत सत्तेवर येईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी गुजरातेत सरकार स्थापन करण्यापासून काँग्रेसला कोणीही थांबवू शकणार नाही, असा मला ठाम विश्वास आहे, असे सांगून गांधी म्हणाले की, गुजरातचे विकासाचे मॉडेल संपूर्णपणे उघडे पडले आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य निकालांनी भाजपा आणि पंतप्रधान भ्यायलेले आहेत. सत्य तुम्ही फार काळ दडवून ठेवू शकत नाही. विकासाच्या मॉडेलने युवक, शेतकरी, छोटा व्यावसायिक किंवा दुकानदार अशा कोणालाही काही मदत केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. फक्त काही ५-१० लोकांना मोदी सरकारने फायदा मिळवून दिला, असा आरोप त्यांनी केला, पण कोणाचेही नाव घेण्याचे मात्र टाळले. (वृत्तसंस्था)
प्रसार माध्यमांवर दबाव-
मोदी यांच्यावर हल्ला करताना गांधी म्हणाले की, त्यांचे सरकार प्रसारमाध्यमांवर दबाव आणत आहे. मोदी हे प्रसारमाध्यमांना दडपणाखाली ठेवतात, हे आम्हाला माहीत आहे. एवढेच काय, प्रसारमाध्यमांतील काही जणांनी आम्ही दबावाखाली आहोत, घाबरलेलो आहोत, हे मला सांगितले आहे.