नवी दिल्ली : इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेले गुजरातचे पोलीस महासंचालक पी. पी. पांडे यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गुजरात सरकारला परवानगी दिली.जामिनावर असलेले पांडे नीयत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर गुजरात सरकारने त्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीस ज्युलिओ रिबेरो यांनी आव्हान दिल्यानंतर पांडे यांनी राजीनाम्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले की, पांडे यांनी राजीनामा दिला असल्याने गुजरात सरकार त्यांची मुदतवाढ रद्द करून तो राजीनामा स्वीकारू शकते.१५ जून २००४ रोजी अहमदाबाद शहराबाहेर गुजरात पोलिसांनी केलेल्या बनावट चकमकीत मुंब्रा येथील इशरत जहाँ,जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, अकबरअली अमजदअली राणा आणि झाशान जोहर असे चारजण ठार झाले होते. त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा या चौघांनी कट रचला होता, असा पोलिसांचा दावा होता. त्यावेळी पांडे गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गुजरातचे डीजीपी पांडे यांचा राजीनामा मंजूर
By admin | Published: April 04, 2017 5:04 AM