अहमदाबाद - गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. शपथविधी झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला पण उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मात्र अजूनही आपल्या खात्याची सूत्र स्वीकारलेली नाहीत. नितीन पटेल अजूनही गांधीनगर सचिवालयाकडे फिरकलेले नाहीत.
अर्थ, शहर विकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्वाची खाती न मिळाल्याने नितीन पटेल नाराज असल्याचे समजते. उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांच गुजरात सरकारमधील महत्व कमी करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नितीन पटेल यांनी यावेळी विजय रुपाणींकडे अर्थ आणि शहर विकास ही दोन खाती मागितली होती अशी माहिती आहे. नितीन पटेल यांचे सरकारमधील महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशी खंत त्यांच्या निकटवर्तीयाने व्यक्त केली.
महत्वाची खाती काढून घेतल्याने मनात असलेली नाराजीची भावना त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर घातली आहे. लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. नितीन पटेल यांच्या नाराजीची दखल घेतली नाही तर ते राजीनामा देऊ शकतात असे सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.
यावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. यावेळी सुद्धा ते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. पटेल आरक्षणाची मागणी आणि पटेल मतदारांची नाराजी लक्षात घेता त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची दाट शक्यता होती. पण पक्ष नेतृत्वाने विजय रुपाणी यांच्यावरच विश्वास दाखवला. विजय रुपाणी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात.
मागच्यावर्षी 2016 मध्ये आनंदीबेन पटेल मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर नितीन पटेल यांचेच नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. तेच गुजरातचे पुढचे मुख्यमंत्री अशा बातम्याही माध्यमांनी चालवल्या होत्या. पण अखेरच्या क्षणी विजय रुपाणी मुख्यमंत्री झाले.