गुजरातमुळे काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल ,पक्षावर मोठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक : वीरप्पा मोईली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:58 AM2017-12-22T01:58:10+5:302017-12-22T01:58:26+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकांनी काँग्रेसला नव्याने चालना दिली आहे. पक्षाचे भवितव्य उज्ज्वलच आहे आणि निवडणुकांमुळे पक्षात अधिक आत्मविश्वास आला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले.
हैदराबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांनी काँग्रेसला नव्याने चालना दिली आहे. पक्षाचे भवितव्य उज्ज्वलच आहे आणि निवडणुकांमुळे पक्षात अधिक आत्मविश्वास आला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले.
पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षावर मोठी शस्त्रक्रिया करावी आणि निवडणुकीच्या आघाडीवर अपयशी ठरलेल्या प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष व राज्य प्रभारी बदलावेत, असेही मोईली यांनी बोलून दाखवले.
गुजरात विधानसभा निवडणुकांमुळे काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह व जोम वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही आगामी निवडणुकीत काँग्रेस विजयी ठरेल, असे मोईली म्हणाले. पक्षाला पुन्हा जोम देण्यासाठी असलेल्या आव्हानांची चर्चा करताना मोईली म्हणाले की, एक किंवा दोन निवडणुकांत लोक जेव्हा अपयशी ठरतात, तेव्हा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (राज्यांतील) प्रभारींना बदलून
त्यांच्या जागी नवे चेहरे नियुक्त करणे गरजेचे आहे.
पक्ष पुढे न्यायचा आहे-
पक्ष संघटनेची संपूर्ण दुरुस्ती करण्याची गरज आहे का, असे विचारता मोईली यांनी निश्चितच, असे उत्तर दिले. ते म्हणाले की, केवळ छोटेमोठे बदल नव्हेत, तर मोठी शस्त्रक्रियाच करावी लागेल. काँग्रेसकडे मोठी शक्ती आहे, नेत्याकडेही तशीच मोठी शक्ती आहे आणि आम्हाला पक्ष निश्चितपणे पुढे न्यायचा आहे, असे त्यांनी म्हटले.