गुजरात विधानसभा निवडणुकीवर एक कोटी 90 लाख ट्विट्स, मोदींचा सर्वाधिक जास्त उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 10:32 PM2017-12-19T22:32:04+5:302017-12-19T22:39:24+5:30
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. याचबरोबर सोशल मीडियात सुद्धा या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. एका अहवालाच्या माध्यमातून गुजरात निवडणुकीच्या काळात म्हणजेच एक डिसेंबरपासून जवळजवळ एक कोटी 90 लाख ट्विट करण्यात आली आहेत. यावेळी #GujaratElection या हॅशटॅगसोबत ट्विट केले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख सर्वाधिक जास्त वेळा करण्यात आला. तर दुसर्या स्थानावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसकडून जीएसटी, नोटाबंदी हे विषय प्रचारासाठी घेतले. मात्र, ट्विटरवर युजर्सनी विकास आणि हिंदुत्व यावरच जास्त चर्चा केल्याचे ट्विटरने म्हटले आहे. 1 डिसेंबर 18 ते डिसेंबरदरम्यानचा हा अहवाल ट्विटरने सादर केला आहे. यात विकास हा मुद्दा ट्विटरवर सर्वाधिक जास्त वेळा आला. तर, हिंदुत्व हा विषय दुसर्या क्रमांकावर आला आहे. याचबरोबर, सर्वाधिक चर्चा झालेल्या विषयात म्हणजेच जीएसटी ही मुद्दा तिसर्या आणि नोटाबंदीचा मुद्दा पाचव्या स्थानावर या अहवालात होता.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत राजकीय पक्ष व नेत्यांनी आपले मुद्दे पटवून देण्यासाठी मोठ्याप्रमात ट्विटरचा वापर केला. यामध्ये युजर्संनी नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक जास्तवेळा उल्लेख ट्विटरवर केला आहे. त्यानंतर राहुल गांधी, अमित शहा आणि हार्दिक पटेल यांचा समावेश आहे. तर या निवडणुकीतील उमेदवारांपैकी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याबाबत सर्वाधिक चर्चा झाली. त्यानंतर दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर अनुक्रमे दुसर्या व तिसर्या स्थानावर असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले. या निवडणुकीत भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. याठिकाणी बहुमतासाठी 92 जागांची गरज होती.