अहमदाबाद - गुजरातच्या सुरत येथे एक आगळावेगळा लग्नसोहळा पार पडणार आहे. कारण, या विवाहसोहळ्याला गोमातेची विशेष उपस्थिती असणार आहे. या गोमातेला साक्षी मानूनच वधु-वर आयुष्यभराची लग्नगाठ बांधत 7 फेरे घेणार आहेत. विशेष म्हणजे या लग्नासाठी छापण्यात आलेली 5 पानांची लग्नपत्रिकाही संपूर्णपणे संस्कृत भाषेतीलच आहे.
लग्नसमारंभात उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी आणि पाहुणेमंडळींना प्लास्टीकऐवजी मातीचे ग्लास देण्यात येणार आहेत. त्यासाठी, कुंभाराकडे 5 हजार ग्लासची ऑर्डरही देण्यात आली आहे. 3 फेब्रवारी रोजी सुरत येथे हा निराळा लग्नसोहळा पार पडणार आहे. या मांडवातील जोडपं असलेले वर-वधु उच्चशिक्षित आहेत. मुलगा रोहित हा बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये पीएचडी करत असून मुलगी अभिलाषा चार्टर्ड अकाऊंटंट आहे. शहरातील प्रसिद्ध कापड व्यावसायिकांच्या कुटुंबातील हा लग्नसोहळा आहे. शहरातील प्रतिष्ठित आणि व्हीआयपी व्यक्तींच्या हजेरीत हा सोहळा पार पडेल. पण, प्रमुख उपस्थिती म्हणून गाय आणि तिचं वासरू असणार आहेत. दरम्यान, 31 ब्राह्मणांच्या वैदिक मंत्रांनी या सोहळ्यात पूजापाठ होईल. लग्नादिवशी मुलाच्या वरातीपुढे गाय आणि वासरू दिसणार आहे. या लग्नसोहळ्यात मिळणारा अहेर समाजसेवी संस्थांना देण्यात येणार आहे.