नवी दिल्ली - गुजरातचा विजय सामान्य नाही तर असामान्य आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकालाचं विश्लेषण केलं आहे. भाजपाचा विजय ज्यांना मान्य नाही, त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्याची गरज नाही असंही ते म्हणाले आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. गुजरातमध्ये भाजपाला 99 जागा मिळाल्या असून, हिमाचल प्रदेशात 44 जागा जिंकल्या आहेत. विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपा मुख्यालयात पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
'गुजरात आणि हिमाचलच्या जनतेचे आभार, त्यांनी विकासाचा मार्ग निवडला, यातूनच सामान्यांच्या समस्यांचं निराकरण होईल. जीएसटीमुळे भाजपचा पराभव होईल अशा अफवा होत्या, महाराष्ट्रात भाजपने जीएसटीनंतरच मोठं यश मिळवलं. उत्तर प्रदेश निवडणूक सुरु होती तेव्हा जीएसटीमुळे पराभव होईल असा दावा करण्यात आला होता, गुजरातमध्येही हीच अफवा पसरवली गेली', अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
'देश बदलासाठी तयार आहे, तसंच बदल घडवणा-या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहत आहे', असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 'निवडणूक सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा असतो. मध्यम वर्गाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, याआधी त्यांच्या काहीच आशा आणि अपेक्षा नव्हत्या, पण आता त्यांच्या मनात आशा आणि अपेक्षा उंचावू लागल्या आहेत', असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
'हिमाचल प्रदेशमधील जनतेने दाखवून दिलं आहे की, विकास केला नाही, चुकीच्या कामात अडकला असाल आणि तीच तुमची प्राथमिकता असेल तर पाच वर्षांनंतर जनता स्विकारणार नाही', असा टोला नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला.
'भाजपाच्या इतिहासात गुजरात निवडणूक ऐतिहासिक आहे. पाच वर्षानंतर एखादं सरकार पुन्हा निवडून येणं त्यांच्या कामाचं कौतुक आहे. राजकीय विश्लेषकांसाठी ही महत्वाची घटना आहे', अशा शब्दांत मोदींनी गुजरात विजयाचं कौतुक केलं. लोकशाही पद्धतीने एकच पक्ष सतत निवडणुका जिंकत असेल तर तो विजय स्विकारला पाहिजे हे सांगायला मोदी विसरले नाहीत. यावेळी मोदींनी 'जितेगा भाई जितेगा..विकासही जितेगा', असा नारा दिला.