भरतपूर : शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासह इतर मागण्या केंद्र व राजस्थान सरकारने मान्य न केल्यास १ नोव्हेंबरपासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा गुज्जर समुदायाच्या नेत्यांनी दिला आहे.
राजस्थानमधील भरतपूर येथे गुज्जर नेते किरोरीसिंह बैन्सला व अन्य नेत्यांनी त्या समुदायाची महापंचायत शनिवारी आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. किरोरीसिंह बैन्सला यांच्यापासून फारकत घेऊन वेगळी संघटना स्थापन केलेल्या हिंमतसिंह यांचाही या महापंचायतीच्या आयोजनात सहभाग होता. गुज्जरांच्या मागण्यांसंदर्भात किरोरीसिंह बैन्सला यांनी सांगितले की, २०११ ते २०१९ या कालावधीत राज्य केंद्र सरकारने आम्हाला अनेक आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता आता सरकारने तातडीने करावी. त्यासाठी सरकारला आम्ही १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
गुज्जर समुदायाची महापंचायत पुन्हा १ नोव्हेंबरला भरविण्यात येणार आहे. तोवर मागण्या मान्य न झाल्यास त्या दिवसापासून आम्ही संपूर्ण राजस्थानात बंद पुकारू, असा इशारा किरोरीसिंह बैन्सला यांचे पुत्र विजय बैन्सला यांनी दिला आहे. ते म्हणाले की, आम्ही अनेकदा आमच्या मागण्या सरकारपुढे मांडल्या; पण त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने काहीच हालचाल होताना दिसत नाही. आता आम्हाला फार काळ कोणीही फसवू शकणार नाही.आंदोलकांवरील खटले मागे घ्या -- राजस्थानमध्ये शासकीय नोकºयांमध्ये १५ प्रकारच्या सेवांमध्ये सध्या भरती सुरू असून, त्यात गुज्जरांना ५ टक्के आरक्षण व तेही अतिमागासवर्गीय (एमबीसी) या प्रवर्गाद्वारे द्यावे, अशी या समुदायाची मागणी आहे.- गुज्जर आंदोलकांवर याआधी दाखल केलेले खटले रद्द करण्यात यावेत, देवनारायण योजना लागू करावी, अशा गुज्जरांच्या आणखी काही मागण्या आहेत.