रमाकांत पाटीलभूज : सफेद वाळवंटाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातच्या भूज, सुरेंद्रनगर आणि मोरबी जिल्ह्यात यावेळी प्रथमच काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला असून, या तिन्ही जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकून गेल्या ४० वर्षांचा इतिहास रचला आहे. विशेषत: यावेळी निवडणुकीत आम आदमी पार्टीने भाजपविरोधी मतांची विभागणी केल्याने तसेच भाजपची प्रचाराची प्रभावी यंत्रणा, काँग्रेसच्या प्रचारापासून दूर राहिलेले राष्ट्रीय नेते याचा फायदा भाजपला झाल्याचे ठळकपणे स्पष्ट झाले आहे.
विधानसभेच्या मतदारसंघाची सुरुवात ज्या भागातून होते त्या भूज जिल्ह्यात भाजपला कधीही सहाच्या सहा जागा मिळविता आल्या नव्हत्या. विशेषत: भूज मतदारसंघात मुस्लीम मतांची संख्या मोठी असतानाही येथे भाजपचे केशुभाई पटेल हे ५९ हजार ८१४ मतांनी विजयी झाले आहेत.
दसाडा पाटडी या मतदारसंघात भाजपने केवळ दोन हजार १३६ मतांनी विजय मिळविला, तर येथे आपच्या उमेदवाराला १० हजार ६० मते मिळाली आहेत. चोटीला मतदारसंघात भाजपचे उमेदवार २५ हजार मतांनी विजयी झाले. या ठिकाणीदेखील आपच्या उमेदवाराला ४४ हजार मते मिळाली. लिमडीमध्येदेखील भाजपचा २३ हजार मतांनी विजय झाला आहे. येथे आपने ५७ हजार ३८८ मते घेतली. त्यामुळे एकूणच आम आदमी पार्टीमुळे तीन ठिकाणी भाजपला फायदा झाल्याचे मानले जात आहे.
दोन भावांच्या लढतीत लहान भावाने मारली बाजीसर्वांत लक्षवेधी ठरलेल्या अंकलेश्वर येथील दोन भावांच्या लढतीत लहान भाऊ भाजपाचे ईश्वरसिंह पटेल यांनी बाजी मारली. ते सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत, तर याच जिल्ह्यातील झगडिया मतदारसंघात सतत सात वेळा विजयी होणारे भारतीय ट्रायबल पार्टीचे छोटू वसावा हे यावेळी मात्र पराभूत झाले आहेत.