सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:30 AM2022-12-09T06:30:23+5:302022-12-09T06:30:46+5:30

पाटीदारांनी ‘हात’ सोडला, गड ढासळला! काँग्रेसचे आमदार फोडल्याचा भाजपला फायदा

Gujrat Election Result: Vimal Chudasama won by 922 votes in Somnath, BJP Seats Increase in Saurashtra | सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा

सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा

googlenewsNext

कमलेश वानखेडे 

राजकोट - २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसला ५४ पैकी तब्बल ३० जागा जिंकून देणाऱ्या सौराष्ट्रनेच यावेळी काँग्रेसला निराश केले. गेल्या वेळच्या पाटीदार आंदोलनाची धार यावेळी बोथट झाली. बहुतांश पाटीदार नेते काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपवासी झाले. एवढेच नव्हे तर डझनभराहून अधिक काँग्रेसचे आमदार ‘पक्षपलटू’ होत भाजपकडून लढले. दिल्लीतून काँग्रेस उमेदवारांना पाहिजे तसे पाठबळ मिळाले नाही. परिणामी गडातच काँग्रेसची चौफेर कोंडी झाली व दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. 

सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न
सौराष्ट्रमधील सोमनाथ व द्वारका काॅंग्रेस व भाजपचे बालेकिल्ले आहेत. ते त्या पक्षांनी कायम राखले. भाजपने सौराष्ट्र एकतर्फी जिंकले असले तरी सोमनाथ मात्र जिंकता आले नाही. येथे काँग्रेसचे विमाल चुडासमा फक्त ९२२ मतांनी जिंकले. गेल्या ३२ वर्षांपासून द्वारकेवर राज करणारे भाजपचे पबुभा माणेक यांना आठव्यांदा द्वारकाधीशाने उचलून धरले. महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या पोरबंदरची जागा भाजपकडून खेचण्यात काँग्रेसला यश आले.

‘आप’ला सौराष्ट्रची साथ, पण...
सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या आम आदमी पार्टीने सौराष्ट्रवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच द्वारकाच्या खंभालिया मतदारसंघातून रिंगणात असलेले इसुदान गढवी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. मात्र, ‘आप’चे हे कार्ड येथे उलटे पडले. 
गढवी हे स्वत:लाही पराभवापासून वाचवू शकले नाहीत. ‘आप’ला  ५ जागा मिळाल्या त्यापैकी ४ जागा सौराष्ट्रने दिल्या आहेत. विसावदर, गरियाधर, जामजोधपूर व बोटाड या जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

राजकोट जिल्ह्यातील सर्व आठही जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसने आपल्या १८ आमदारांना पुन्हा तिकीट दिले होते. मात्र, त्यापैकी फक्त दोन आमदार जागा राखण्यात यशस्वी ठरले. भाजपने बहुतांश नवे चेहरे दिले. पण पक्ष संघटनेच्या बळावर ते विजयी झाले. 

सौराष्ट्रमधील चित्र
पक्ष    २०१७    २०२२ 
भाजप    २३    ४६ 
काँग्रेस    ३०    ०३ 
इतर    ०१    ०१ 
आप     -    ०४

Web Title: Gujrat Election Result: Vimal Chudasama won by 922 votes in Somnath, BJP Seats Increase in Saurashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.