अहमदाबाद : गुजरातमध्येअपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव कारने 12 भाविकांना चिरडले. यातील सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील बहुतांश भाविक पंचमहाल जिल्ह्यातील कलोल येथील रहिवासी असून ते अंबाजी दर्शनासाठी पायी जात होते. यावेळी वेगाने येणाऱ्या कारने 12 भाविकांना चिरडले. यात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याअपघातात कारच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. दरम्यान, गुजरातमधील अंबाजी मंदिर हे शक्ती, भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम असल्याचे म्हटले जाते. या देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक येतात.
याआधी रक्षाबंधनाच्या दिवशी आनंद जिल्ह्यात भीषण अपघात झाला होता. याठिकाणी झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील पीडित महिला रक्षाबंधन साजरी करून परतत होत्या. हा अपघात आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तहसीलमधील डाळी गावाजवळ घडला होता. येथे कार, ऑटो रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली होती. या वाहनांची धडक इतकी वेगवान होती की त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.