नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत गुना मतदारसंघातून माजी खासदार आणि ग्वाल्हेर घराण्याचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पराभव झाला. गुना या मतदारसंघावर ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जबरदस्त प्रभाव होता. तिथली जनताही त्यांना आदरभाव देत असते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच ज्योतिरादित्य सिंधिया गुनामध्ये पोहोचले आणि त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठकही घेतली.बैठकीत पदाधिकाऱ्यांना ते म्हणाले, माझ्या पराभवाला मीच जबाबदार आहे. मी मतदारसंघात मेहनत करण्यास कुठे तरी कमी पडलो, म्हणूनच माझा पराभव झाला. त्यानंतर सिंधिया यांच्या समोर बसलेली महिलेला रडूच कोसळलं. तेव्हा सिंधियांनी तिला धीर दिला. त्यानंतर मंचावर जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मी पराभवाची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी आज गुनामध्ये आलो आहे. लवकरच कार्यकर्त्यांचं संघटन आणखी मजबूत केलं जाईल.मी पक्षाचा एक शिपाई आहे. सच्च्या शिपायासारखं मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. पराभवाची कारणं जाणून घेण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंद खोलीत पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. यावेळी तिथे कॅबिनेट मंत्री तुलसी सिलावट, महिला आणि बालविकास मंत्री इमरती देवी, कामगार मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपाच्या डॉ. केपी यादव यांनी सव्वा लाख मतांनी पराभव केला आहे.
ज्योतिरादित्य सिंधियांनी सांगितलं पराभवाचं कारण अन् महिलेला रडूच कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 12:31 PM