नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे नागरिक पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्ततेसाठी भारताकडे मदतीची याचना करत आहेत. बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) येथील लोकांच्या मनात पाकविषयी कटुता निर्माण झाली आहे. येथील राष्ट्रवादी समता पक्षाचे (एनईपी) अध्यक्ष प्रा. सज्जाद रझा म्हणाले की, जम्मू-काश्मीर विधानसभेत पीओकेसाठी २४ जागा राखीव आहेत. जेव्हा-जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आम्हाला भारतीय संविधानानुसार नावनोंदणी करायची असते.
भारताने पीओकेत जन्मलेल्या नागरिकांनाही सुविधा द्याव्यात. त्यांना लोकसभा, राज्यसभेवरही स्थान द्यावे, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले. रझा म्हणाले, ‘पाकने बंदुकीच्या जोरावर पीओके ताब्यात घेतला. भारतानेही बंदुकीच्या जोरावर त्याला येथून हाकलून द्यावे.
५ वर्षांत पाकला हुसकावून लावू पीओकेतील आरक्षित जागांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जावी. आम्ही पीओकेमध्ये रुग्णालये, शाळा बांधू. जर पाकिस्तानने हा विकास निधी वापरण्यास मज्जाव केला तर संपूर्ण जगात इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीसमोर त्याचा पर्दाफाश करू. भारताने आम्हाला साथ दिली तर आम्ही पाकिस्तानला पाच वर्षांत हाकलून लावू शकतो, असे ते म्हणाले.
पाकला उघडे पाडूपीओकेत कोणतीही निवडणूक नाही, सर्व काही लष्कर ठरवते. तथाकथित राष्ट्राध्यक्ष पाकच्या पैशाने जगभर फिरतात, काश्मीरबाबत खोटी विधाने करतात. जर भारताने आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना जिनिव्हापासून संयुक्त राष्ट्रांपर्यंत सर्वत्र उघडे पाडू, असेही ते म्हणाले.