नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजस्थान प्रभारी गुरुदास कामत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना कथितरीत्या ‘कामवाली बाई’ संबोधून शुक्रवारी वाद ओढवून घेतला. त्यानंतर २४ तासांच्या आत राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) मनुष्य बळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांना नोटीस बजावण्यात आली असून, एका आठवड्याच्या आत स्पष्टीकरण मागितले आहे.कामत यांच्या वक्तव्यावरून देशभर प्रतिक्रिया व्यक्त होत असताना राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीने एक निवेदन जारी करून कामत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. कामत यांच्या तथ्यांवर आधारित टीकेचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा राजस्थान काँग्रेसने केला असून संदर्भ लक्षात न घेता कामत यांना लक्ष्य करणे गैर असल्याचे म्हटले आहे.पाली येथे एका जाहीर सभेत बोलताना गुरुदास कामत यांनी कथितरीत्या इराणी यांच्यावर टीका केली. स्मृती इराणींच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी काम केले. तेव्हा त्या केवळ अल्पशिक्षित होत्या आणि हॉटेलातील टेबल स्वच्छ करायचे काम करायच्या. भाजप सत्तेवर येताच नरेंद्र मोदी यांनी ‘अशिक्षित’ इराणींना शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. ‘अशिक्षित’ इराणी ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ बनल्या, असे कामत म्हणाले.चुकीचा अर्थ- काँग्रेस कामत यांची टीका तथ्यांवर आधारित असून काँग्रेस कुठल्याही कामाला कमी लेखत नाही. इराणी मॅकडोनल्समध्ये काम करून चुकल्या आहेत, हा त्यांच्या भाषणातील सहज संदर्भ होता. मनुष्यबळ विकास मंत्रालयासारख्या महत्त्वपूर्ण मंत्रालयाची जबाबदारी एका अल्पशिक्षित व्यक्तीकडे का? हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाने देशातील जनतेलाच नाही तर खुद्द भाजपातील अनेकांनाही विचलित केले आहे. कामत यांनी आपल्या भाषणात या तथ्याला आणि संदर्भाला धरून भाष्य केले.
गुरुदास कामत यांना महिला आयोगाची नोटीस
By admin | Published: August 02, 2015 3:28 AM