हरीश गुप्ता नवी दिल्ली : भाजपा नेते आणि सिनेस्टार विनोद खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात बुधवारी (दि. ११) मतदान होत आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या लोकप्रियतेची ही चाचणी असणार आहे. या निकालाच्या आधारे भाजपा अन्य राज्यांतील सात मतदारसंघांतील लोकसभेच्या पोटनिवडणुकांची रणनीती आखणार आहे. विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता या भाजपाकडून उमेदवारीच्या स्पर्धेत होत्या. पण, पक्षाने ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे उद्योजक स्वर्ण सलारिया यांना उमेदवारी दिली.काँग्रेसने दिवंगत नेते बलराम जाखड यांचे चिरंजीव सुनील यांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पार्टीने मेजर जनरल (सेवानिवृत्त) सुरेश खजुरिया यांना मैदानात उतरविले आहे. २०१४ मध्ये भाजपाने या मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यानंतर भाजपा व अन्य विरोधी पक्षातील राजकीय लढाई सुरूच आहे. पण, बदलती राजकीय समीकरणे आणि अर्थव्यवस्थेतील कमजोरीमुळे काँग्रेसला पुनरुज्जीवनाची अपेक्षा आहे.लोकसभेच्या पोटनिवडणुका ज्या सात मतदारसंघांत होणार आहेत त्यात अररिया (बिहार), गोरखपूर आणि फूलपूर (उत्तर प्रदेश), अल्वर आणि अजमेर (राजस्थान), अनंतनाग (जम्मू-काश्मीर) आणि उलुबेरिया (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि केशवप्रसाद मौर्य हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अनुक्रमे गोरखपूर आणि फूलपूर या जागा रिक्त झाल्या आहेत. तर, अन्य पाच जागांवरील विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. अररियामधील निवडणूक भाजपा - जदयू आघाडीला अवघड आहे. कारण, २०१४ मध्ये या जागेवर मोदी लाटेतही राजदचे तस्लिमुद्दीन हे विजयी झाले होते. उलुबेरियातही भाजपाचा फारसा प्रभाव नाही. जम्मू - काश्मीरातील पोटनिवडणुकीसाठी भाजपा व पीडीपी उत्सुक नाहीत.गुरुदासपूरमधील जागा राखण्याबाबत भाजपा नेतृत्व उत्साही दिसत नाही. भाजपाचे उमेदवार स्वर्ण सलारिया यांचे एका महिलेसोबतचे फोटो समोर आल्यानंतर येथे मोठा वाद झाला. गृहमंत्री राजनाथ सिंह अथवा अरुण जेटली यांनी गुरुदासपूरमध्ये प्रचारासाठी वेळ काढला नाही. यावरून हे दिसून येते की, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे या पोटनिवडणुकीसाठी सहजपणे काम करताना दिसत नाहीत. पण, दुसºया प्रमुख नेत्यांनाही का दूर ठेवण्यात आले. अकाली दलाकडून भाजपाला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. सुखबीर बादल हे या मतदारसंघात गत दहा दिवसांपासून तळ ठोकून आहेत.
गुरुदासपूर पोटनिवडणुकीत भाजपा-काँग्रेसची सत्त्वपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:05 AM