नवी दिल्ली - गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील चर्चित प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याच्या नादात पोलिसांनी बस कंडक्टर अशोक कुमारजवळ हत्यार सापडल्याचा दावा करत आरोपी बनवण्याचा प्रयत्न केल्याचं सीबीआय तपासात उघड झालं आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या सीबीआय तपासानंतर शाळेतीलच 16 वर्षीय विद्यार्थ्याने एका दुकानातून चाकू खरेदी करत प्रद्युम्नची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.
तपासाशी संबंधित एका सीबीआय अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'हा चाकू अल्पवयीन आरोपीने एका स्थानिक दुकानातून खरेदी केला होता. हाच चाकू विद्यार्थ्याने शाळेच्या आत नेला होता. पोलिसांना सापडलेला हा एकमेक चाकू आहे. त्यामुळे पोलिसांनी बस कंडक्टर अशोकने शाळेत चाकू आणल्याचा केलेल्या दाव्याला काही आधार नाही'.
गुरुवारी आरोपीने ज्या दुकानातून चाकू खरेदी केला होता त्याबद्दलही माहिती दिली आहे असं सीबीआय अधिका-याने सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'अल्पवयीन आरोपीने आपले वडिल, एक स्वतंत्र साक्षीदार आणि सीबीआय अधिका-यासमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. आपण काही सेकंदात प्रद्युम्नचा गळा कापला आणि शौचालयाबाहेर आलो अशी कबुली आरोपीने दिली आहे'.
सीबीआयकडून 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर बस कंडक्टर अशोक कुमारच्या कुटुंबाने हत्येचा खोटा आरोप लावत अटकेची कारवाई करणा-या पोलीस अधिका-यांविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशोक कुमारचे वडील अमीरचंद यांनी सांगितलं आहे की, 'माझ्या मुलाला फसवण्यात आलं होतं हे जवळपास स्पष्ट झालं आहे. आम्ही गुरुग्राम पोलिसांच्या विशेष तपास पथकाविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलीस अधिका-यांनी त्याला अडकवलं, आणि प्रसारमाध्यमांसमोर गुन्हा कबूल करावा यासाठी धमकावलं, तसंच अंमली पदार्थांचा डोसही दिला'. पोलीस अधिका-यांविरोधात केस दाखल करण्यासाठी आपण ग्रामस्थांकडे आर्थिक मदत मागितली असल्याचं अमीरचंद यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?8 सप्टेंबर रोजी गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूरची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी स्कूल बसचा कंडक्टर अशोक कुमारसह तीन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी अशोक कुमारने हत्या केल्याची कबुली दिली होती. पण नंतर कोर्टात त्याने जबाब फिरवला. दबावात येऊन मी हत्या केल्याची कबुली दिली होती, असं अशोक कुमारने सांगितलं होतं.