हरयाणा: पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयानं डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिमला दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात न्यायालयाकडून 17 जानेवारीला न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या सुनावणीसाठी सुनारिया तुरुंगात असलेल्या राम रहिमला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तुरुंग आणि न्यायालय परिसरात चोख सुरक्षा ठेवण्यात आली होती. पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निकाल दिला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. राम रहिमच्या अनुयायांकडून हिंसाचार होण्याची शक्यता असल्यानं त्याला न्यायालयात कसं हजर करायचं, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्यामुळेच राम रहिमला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. यासाठी पोलिसांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाला विनंती केली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण?पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरण 16 वर्ष जुनं आहे. 2002 मध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपतींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. छत्रपती सतत त्यांच्या वृत्तपत्रातून डेरा सच्चा सौदा आणि त्यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध करत होते. यामुळे त्यांनी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास नोव्हेंबर 2003 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. 2007 मध्ये सीबीआयनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. यात राम रहिम मुख्य आरोपी होता.