चंदीगड: हरियाणाच्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेला गुरमीत राम रहीम सातत्याने मिळणाऱ्या पॅरोलमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा सरकारने त्याला 50 दिवसांचा पॅरोल दिला आहे. विशेष म्हणजे, 29 दिवसांपूर्वी राम रहीम पॅरोलनंतर तुरुंगात परतला होता. पण आता पुन्हा एकदा तो तुरुंगातून बाहेर येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा सरकारने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला 50 दिवसांचा पॅरोल दिला आहे. हा त्याला मिळालेला आठवा पॅरोल आहे. या पॅरोल काळात तो उत्तर प्रदेशातील बागपतच्या बर्नवा आश्रमात मुक्काम करेल. शुक्रवारी संध्याकाळी किंवा शनिवारी सकाळी राम रहीम रोहतक तुरुंगातून बाहेर येईल. दरम्यान, हरियाणा तुरुंगाच्या नियमांनुसार, कोणताही कैदी वर्षातून 70 दिवसांसाठी पॅरोल घेऊ शकतो.
2017 मध्ये पत्रकार हत्या आणि बलात्कार प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवण्यात आले होते. तुरुंगात गेल्यापासून आतापर्यंत त्याला आठ वेळा पॅरोल आणि फर्लो मिळाला आहे. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (SGPC) गुरमीत राम रहीमला वारंवार पॅरोल मंजूर केल्याप्रकरणी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला वारंवार मिळणाऱ्या पॅरोलमुळे हरियाणा सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.