बलवंत तक्षक चंदीगड : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत सिंह राम रहिम यांना त्यांची पांढरी झालेली दाढी काळी करायची असून तुरुंगात असल्यामुळे त्यांना त्यासाठी मंजुरी मिळत नाही. आता त्यांनी मंजुरीसाठी हरयाणा मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली. साध्वीच्या लैंगिक शोषण प्रकरणात २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ते रोहटकमधील सुनारिया तुरुंगात भोगत आहेत. ते तुरुंगात आले तेव्हा त्यांची दाढी काळी होती. आता ती पांढरी झाल्यामुळे ती त्यांना नको आहे. त्यांना बऱ्याच दिवसांपासून रंग देऊन काळी करायची आहे. तुरुंग प्रशासनाकडे त्यांनी ही मागणी अनेक वेळा केलीही. परंतु, अजून ती विचारात घेण्यात आलेली नाही.
हरयाणा मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस.के. मित्तल यांनी नुकतीच सुनारिया तुरुंगाची पाहणी केली. राम रहिम यांनी तेव्हा आयोगाकडे ही मागणी केली होती. आयोगानेही अजून मागणीवर काही निर्णय घेतलेला नाही. साध्वी लैगिक शोषण प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २०१७ मध्ये सिरसात राम रहम यांना २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यापासून ते सुनारिया तुरुंगात आहेत.