नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. खलिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिसचा दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भगवंत मान यांना धमकी दिली आहे. पन्नू याने गुंडांना २६ जानेवारी रोजी भगवंत मान यांच्यावर हल्ला करण्यासाठी एकत्र येण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील गुंडांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले असून राज्यातील गुंडांवर कारवाई सुरू केली आहे. दहशतवादी पन्नूला गुंडांवर कठोर कारवाईचा फायदा घ्यायचा आहे आणि तो त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे. त्यामुळेच त्याने गुंडांना आपल्यासोबत येण्यास सांगितले आहे. खलिस्तानी दहशतवाद्याने मुख्यमंत्री भगवंत मान आणि डीजीपी गौरव यादव यांना २६ जानेवारीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी गुरपतवंत सिंग पन्नूने गुन्हेगारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
पन्नू २०१९ पासून NIA च्या रडारवर
राष्ट्रीय तपास यंत्रणेने या वर्षी पन्नूविरोधात पहिला गुन्हा दाखल केला होता. खलिस्तानी दहशतवादी पन्नू २०१९ पासून एनआयएच्या रडारवर आहे. परदेशात राहून पन्नू सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आहे अशी माहिती तपास यंत्रणांकडे होती. पंजाबमध्ये फुटीरतावाद वाढल्याचा आरोप त्याच्यावर होता. याशिवाय भारतात वेगळे खलिस्तान राज्य निर्माण करण्यासाठी तरुणांना भडकवल्याचा आरोप त्याच्यावर होता.
कोण आहे खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू?
गुरपतवंत सिंग पन्नू हा खानकोट, पंजाबचे रहिवासी आहेत. १९४७च्या फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब पाकिस्तानातून अमृतसरमधील खानकोट गावात स्थलांतरित झाले होते. पन्नू याने पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तो परदेशात गेला. तेव्हापासून तो कॅनडा आणि अमेरिकेत राहतो. परदेशात राहून तो खलिस्तानी चळवळ चालवत आहे. यामध्ये त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची मदत मिळते. त्यांनी शिख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) स्थापन केली आहे. पन्नू सोशल मीडियावर सतत फुटीरतावादी बोलतो आणि भारताविरुद्ध विष ओकत राहतो. २०१९मध्ये भारत सरकारने शिख फॉर जस्टिस या संघटनेवर बंदी घातली होती.