हरियाणातील गुरुग्राममधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. 40 लाख किमतीच्या कारमधून दोघेजण आले आणि चौकाचौकात सजवलेली 400 रुपयांची रोपं चोरुन नेली. जी-20 परिषदेसाठी शहराला सजवण्यासाठी ही रोपं इथं ठेवण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शहर विकास प्राधिकरणाने आरोपींवर कारवाई केली.
1 मिनिट 7 सेकंदाचा व्हायरल व्हिडिओ गुरुग्राममधील शंकर चौकातील आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कार येऊन थांबते, गाडीतून दोघे उतरतात आणि चौकात सजावटीसाठी ठेवलेली विशेष प्रकारची रोपांची भांडी उचलून गाडीच्या ट्रंकमध्ये ठेवतात. झाडे चोरणाऱ्यांचा चेहराही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र चोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. चोरट्यांच्या आलिशान कारचा क्रमांकही व्हीआयपी आहे.
हा व्हिडिओ हरियाणाचे भाजप प्रवक्ते रमन मलिक यांनी शेअर केला आहे. त्यांनी गुरुग्राम पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुरुग्राम महानगर विकास प्राधिकरणाचे संयुक्त सीईओ एसके चहल यांनी सांगितले की, हा व्हायरल व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला असून चोरांवर कारवाई केली जाईल. हा व्हिडिओ ट्विटरवर 3,000 हून अधिक लाइक्ससह 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकजण या घटनेची खिल्लीही उडवत आहेत.