गुरुग्राम – मागील काही दिवसांपासून अनेक शहरांत खुल्या जागेत दर शुक्रवारी नमाज पठण करण्यास विरोध होत आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्येही हा वाद पेटत चालला आहे. अनेक खुल्या जागेत नमाज पठण करण्यासाठी विरोध होत आहे. तर काही ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. अशावेळी शहरात सर्वधर्मसमभाव पाहायला मिळत आहे. शिख समुदायाने पुढाकार घेत मुस्लिमांच्या नमाजसाठी गुरुद्वारा उघडला आहे.
हेमकुंट फाऊंडेशनचे हरतीरथ सिंग यांनी ट्विट करत म्हटलंय की, सदर बाजार गुरुद्वारा आता मुस्लीम बांधवांसाठी खुला करण्यात आला आहे. शहरातील सध्या परिस्थिती पाहता ते याठिकाणी प्रत्येक दिवशी येऊन नमाज पठण करु शकतात असं सांगितले आहे. दुसरीकडे गुरुग्रामच्या गुरुद्वारा सिंग सभा कमिटीनेही जर मुस्लीम समाजाला चालत असेल तर त्यांनी शहरातील गुरुद्वारेत येऊन नमाज अदा करावी असं सांगितले आहे.
गुरुग्राम गुरुद्वारा प्रबंधन कमिटीचे प्रमुख शेरदील सिद्धू यांनी मुफ्ती सलीम यांना सदर बाजार गुरुद्वारा दाखवला. शुक्रवारी याच गुरुद्वारेत गुरुवाणीसह नमाजदेखील ऐकायला मिळेल. जर शुक्रवारी मुस्लीम समुदायाला नमाज पठण करण्यासाठी विरोध होत असेल तर त्यांनी गुरुद्वारेत यावं असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
हिंदु युवकानेही नमाजासाठी दिलं दुकान
गुरुग्रामच्या सेक्टर १२ इथं अक्षय नावाच्या हिंदु युवकानेही रिकामे दुकान नमाज पठण करण्यासाठी दिले आहे. अक्षयचं मॅकेनिक मार्केटमध्ये अनेक दुकानं आहे. त्यातील काही दुकानांमध्ये त्याने मुस्लीम समुदायाला नमाज पठण करण्यासाठी जागा दिली आहे. यावर गुरुग्रामधील मुफ्ती सलीम म्हणाले की, मी खूप आनंदी आहे. लोकं त्यांच्याकडून आम्हाला नमाज अदा करण्यासाठी जागा देत आहेत. काहीच लोक हे वातावरण खराब करण्यासाठी प्रयत्न करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
गुरुग्राममध्ये ३७ ठिकाणी ऐवजी आता २० ठिकाणीच नमाजाला परवानगी
गुरुग्राम सेक्टर १२ ए शुक्रवारी खुल्या नमाजाला विरोध होत आहे. अनेक लोकं याविरोधात रस्त्यावर उतरले आहे. याबाबत हिंदु संघटनांनी इशारा दिला होता. २ वर्षापूर्वी गुरुग्राम प्रशासनाने ३७ जागांवर नमाज होण्याऐवजी २० जागांवर नमाजाची परवानगी दिली आहे.