नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण नानाविध शक्कल लढवत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
उत्तर प्रदेशमधील गुरुग्राममध्ये एका तरुणाने टिकटॉक व्हिडिओसाठी चक्क आपल्या वडिलांच्या गाडीवर लाल दिवा लावल्याची घटना समोर आली आहे. देशभरामध्ये लॉकडाऊन सुरू असला तरी काही भागांमध्ये विशेष परवाना देऊन खासगी गाड्यांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. याच परवान्याचा वापर करुन गुरुग्राममधील एका तरुणाने आपल्या वडिलांच्या वोल्सवॅगन गाडीवर सरकारी गाड्यांवर लावला जातो तसा लाल दिवा लावला. टिकटॉकवर व्हिडीओ करता यावा यासाठी त्याने तो दिवा लावला आणि नंतर ती गाडी घेऊन तो फिरत होता. याच दरम्यान पोलिसांनी हे पाहिलं आणि त्याला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'लाल बत्तीवाली गाडी के थे सपने मेरे' या हरियाणी गाण्यावर तरुणाला टिकटॉक व्हिडिओ तयार करायचा होता. त्यासाठी त्याने लाल दिवा विकत घेतला. गाड्यांशी संबंधित सामान मिळणाऱ्या एका दुकानातून त्याने हा लाल दिवा विकत घेतला होता. नियमांप्रमाणे लाल दिव्यांच्या वापर आता अगदीच मर्यादित गाड्यांसाठी करण्यात येतो. आपत्कालीन वाहने यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिसांच्या गाड्यांवरच असे लाल दिवे लावण्याची परवानगी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शनिवारी दुपारी हा तरुण गाडीवर लाल दिवा लावून टिकटॉक व्हिडिओ शूट करत फिरत होता त्यावेळी त्याला पोलिसांनी अतुल कटारिया चौकात अडवले. गुन्हा विभागाचे निरीक्षक नरेंद्र चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, समोरुन लाल दिव्याची गाडी येताना पाहून नाकाबंदीजवळ तैनात असणाऱ्या पोलिसांना थोडा संशय आला. त्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला. त्यावेळी या तरुणाने गाडी जोरात पळवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांनी हा लाल दिवा जप्त केला असून सेक्टर 14 च्या पोलीस चौकीत तो सोपवला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी तरुणाकडून साडेसात हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती समोर आली आहे.