केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी गुजरात आम आदमी पार्टीचे (AAP) प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल इराणी यांनी इटालिया यांचा ‘गटर माऊथ’ असा उल्लेख केला. गोपाल इटालिया यांना जामीन मिळाला आहे. एक व्हिडिओ शेअर करताना स्मृती इराणी यांनी गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
“अरविंद केजरीवाल, गटरासारखं तोंड असलेल्या गोपाल इटालिया यांनी तुमच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीरा बा यांच्याविरोधात अपशब्द काढले. मला कोणतीही नाराजी व्यक्त करायची नाही, गुजराती किती नाराज आहेत हेही दाखवायचं नाही. परंतु तुम्हाला जनतेने पाहिलंय हे जाणून घ्या. गुजरात निवडणुकीत तुमचा पक्ष नष्ट होईल,” असे इराणी म्हणाल्या.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर गोपाल इटालिया चर्चेत आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या होत्या. दरम्यान, त्यांचा आता जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह टीप्पणी करत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसऱ्या व्हिडिओत ते महिलांसंदर्भातही आक्षेपार्ह बोलत असल्याचे दिसत आहे. गोपाल इटालिया हे गुजरात मधील पाटीदार समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. ते याअगोदरही वादामध्ये सापडले होते. ते सध्या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे काम करत आहेत. आम आदमी पक्षाने गुजरात मधील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.