गुवाहाटी - पतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून आसाममधील एका न्यायालयाने पतीच्या हत्येसाठी पत्नीला जबाबदार ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून तुरुंगात असलेल्या या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने आता सुटका केली आहे. आसाम सत्र न्यायालयाचा महिलेच्या शिक्षेसंदर्भातला निर्णय आसाम उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर या महिलेला न्याय मिळाला आहे.
पाच वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी पतीच्या अंत्यसंस्काराच्यावेळी त्याची पत्नी अजिबात रडली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या हत्येसाठी पत्नीलाच आरोपी ठरवले होते. सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने देखील महिलेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने महिलेला या परिस्थितीजन्य पुराव्यांवरून दोषी ठरवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि महिलेची निर्दोष मुक्तता केली आहे.